विशाळगड | Vishalgad
विशाळगडाला प्राचीन नाव होते “खेळणा”. विशाळगड किल्ला हा नावाप्रमाणेच विशाल आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या किल्ल्याचे नामकरण विशाळगड केले होते.कोकणातील बंदरांना कोल्हापूर मधील बाजार पेठेशी जोडण्याकरिता घाटमार्गावर लक्ष्य ठेवण्याकरिता आणि संरक्षणाकरिता हा किल्ला बांधला गेला.म्हणूनच या किल्ल्याला इतिहासामध्ये लष्करीदृष्ट्या महत्त्व प्राप्त झाले होते. विशाळगड कोल्हापूराच्या वायव्येला ८० कि.मी. अंतरावर आहे.तर पन्हाळा किल्ल्याच्या पश्चिमेस अंदाजे 60 किमी वर आहे.कोल्हापूर रत्नागिरी रस्त्याच्या दक्षिणेस सुमारे २१ किलोमीटर अंतरावर आहे.याच परिसरात अणूस्कुरा घाट आणि आंबा घाट आहेत. शाहूवाडी तालुक्यात हा किल्ला असून गडाच्या चोहोबाजूने खोल दर्या आहेत. गडावर चार दरवाजा, तळे, वृंदावने, टकमक कडा, रामचंद्र निळकंठ यांचा जुना राजवाडा, हजरत रेहान मलिक दर्गाह, पाताळदरी आदी ठिकाणे प्रेक्षणीय आहेत.याशिवाय गडावर बाजीप्रभु आणि फुलाजीप्रभु देशपांडे यांच्या समाधी आहेत.गडमाथ्यावरून खाली दरीत पाहताना अफाट दृश्य दिसते. सभोवताली गर्द हिरवीगार झाडे दिसतात.