वाराणस्यधिकं क्षेत्रं, करवीरपुरं महत् ।
आद्यं तु वैष्णवं क्षेत्रं शक्त्यागमसमन्वितम्।
भुक्तिमुक्तिप्रदं नृणां वाराणस्या यवाधिकम् ॥
अर्थात, वाराणसीहून (काशीहून) करवीरचे माहात्म्य अधिक आहे.हे आद्य वैष्णव क्षेत्र शक्तिपीठही आहे.ते मानवांना ऐहिक आणि पारलौकिक सुख देते, ते वाराणसीहून जनभर अधिकच श्रेष्ठ आहे. इत्यादी वर्णने करवीर क्षेत्राचा व आसपासच्या परिसराचा गौरव व्यक्त करतात.डॉ. ग. वा. तगारे यांनी संपादिलेल्या आणि शिवाजी विद्यापीठाने प्रकाशित केलेल्या संस्कृत ‘करवीर माहात्म्य’ ग्रथांचा रचनाकाळ इ. स. १३०० ते १३५० असा ठरविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे,परंतु तो काल सर्वमान्य झालेला नाही.पंडित, कवी आणि ज्योतिषी म्हणून विख्यात असलेल्या कोल्हापूरच्या जोशीराव घराण्यातील श्री. दाजिबा जोशीराव यांनी संस्कृत व मराठी भाषेत अनेक ग्रंथ रचले.दाजिबा जोशीराव यांनी रचलेल्या या ‘करवीर माहात्म्य’ ग्रंथाचे सुमारे बहात्तर अध्याय असुन ओवी संख्या सुमारे साडेपाच हजाराहून अधिक आहे.करवीर माहात्म्याबद्दल ऋषींनी सुतांना प्रश्न विचारला. पूर्वी मार्कडेयास नारदांनी सांगितलेले या क्षेत्राचे माहात्म्यम सुतांनी ऋषींना सांगितले.महर्षी अगस्ती उत्तरेकडील काशीक्षेत्री राहणे सोडून दक्षिण काशी म्हणजे करवीर येथे का आले, याचा इतिहास प्रारंभी देण्यात आला आहे.
कृतयुगात करवीरक्षेत्र ४८ योजने परिघाचे, त्रेतायुगात २४ योजने परिघाचे आणि द्वापारयुगात १२ योजने परिघाचे आणि कलियुगात ६ योजने परिघाचे आहे. म्हणून केवळ श्री महालक्ष्मीचेच नव्हे, तर आसपासच्या परिक्षेत्रांतील देवतांचे, तीर्थांचे माहात्म्य या ग्रंथात देण्यात आले आहे.या ग्रंथामध्ये वर्णन केलेली सर्व तीर्थे,मंदिरे आजही कोल्हापूर मध्ये अस्तित्वात आहेत याची सखोल माहिती आपण घेणार आहोत.करवीर महात्म्य मुळ संस्कृत पुस्तक व गोष्टीरूप करवीर महात्म्य याचा संदर्भ घेत आहोत.त्याचबरोबर अध्यायाच्या खाली श्री करवीर महात्म्याचे व्हिडीओ स्वरूपामध्येेेही पाहू शकता याचे सादरीकरन मुर्ती व मंदिर अभ्यासक श्री.प्रसन्न विश्वंभर मालेकर यांनी केले आहे.