श्री जोतीबा चैत्र यात्रा मधील प्रथम मानाची सासनकाठी असणार्या पाडळी गावाची परंपरा

 

“पाडळी” गावचा दरारा,
त्याला शेकडो वर्षांची परंपरा,
एकमेकांच्या शिरा,
फडकत राहील फरारा,
खोचू मानाचा तुरा,
उधळु गुलाल सगळा,
आनंदाने पार पाडु ही यात्रा..


 चैञाची चाहुल लागताच गावोगावी याञा-जञांचा माहौल चालु होतो.याच चैञ महिन्यात हस्त नक्षत्रावर पश्चिम महाराष्ट्रातील सर्वांत मोठी जोतिबा डोंगरावरची याञा पार पडते.साधारणपणे ८/१० लाख भावीक या याञेला उपस्थित असतात.याच याञेत पहिला मान असणार्या तीर्थक्षेञ निनाम पाडळी या गावाबद्दल आपण माहीती घेवुया ! सातारा जिल्ह्यातील ठराविक मोठ्या याञांमध्ये पाडळी गावचा समावेश होते.शासनाने नुकताच काही वर्षे पुर्वी या तीर्थक्षेञाला “क” वर्ग दर्जा दिलेला आहे.

श्री वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा ज्योतिबा अर्थात नाथ केदारेश्वर हे बद्रिकेदारचेचे रूप आहे.ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी व १२ सूर्याचे तेज या सर्वाचा मिळून एक तेजःपुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ ! ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश,वायू, तेज, आप (पाणी) आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तीदैवत म्हणजेच वाडी रत्नगिरीचा ज्योतिबा.

जोतीबा डोंगरावरची व गावातील याञा पार पाडणे हे मोठे जोखमीचे काम असते पण पाडळीकर संपूर्ण गाव हे एकत्र होवुन रांगडेपणाणे ही याञा पार पाडतात.याञेमध्ये गावातील अठरापगड जातीसहीत प्रत्येक घटक सामिल असतो हे गावच्या एकीच प्रतिक आहे .सासनकाठीला तीचे स्वतः चे असे २४ देवसेवक आहेत यामध्ये ( कारखानदार, भालदार, ईटेकरी,हलगीवाले,घडशी,चौगुला, शिवता शिंपी, कोळी,माळी, कुंभार,हरदास,तेली,दिवटी,नाथडवरी,रूमाल परीट,छञी,अब्दागिरी ,गुरव,रखवालदार इ. ) आहेत ते आपआपली सेवा चोख बजावत असतात व मानाच्या तीन प्रमुख तक्क्षिमा आहेत.यावरून या सासनकाठी व्याप्ती आपल्या लक्षात येते.दख्खन राजा जोतिबा ला साजेश्या सरदारा प्रमाणेच पाडळी गाव च्या या मानाच्या निशाणाचा रूबाब आहे.जोतिबा चैञीउत्सवामधे संपूर्ण गाव महिनाभर मासांहार वर्ज्य करते हे ही या गावाचे वेगळे वैशिष्ट्य आहे.

देवस्थान व याञा सोहळा माहिती

 कोल्हापूर-पुणे महामार्गावर सातारा तालुक्यातील नागठाणे या गावापासून पश्चिमेला पाच किलोमीटरवर निसर्गरम्य परिसरात वसलेले गाव म्हणजे पाडळी.या गावचा प्राचीन उल्लेख “करवीर महात्म्य ” या  ग्रंथामध्ये “पाटली पत्तन” हे इंद्रदेवाचे गाव म्हणून येतो,तसेच शिवकालीन कालखंडात थोरले छ.शाहु महाराज दप्तर ,जाधवराव व घोरपडे घराण्याच्या कैफियत आणि पानिपत काळात ही सापडतात.जोतिबा डोंगर (ता. पन्हाळा), जि. कोल्हापूर यथील चैत्र यात्रेत सामील होण्याऱ्या मानाच्या १०८ सासनकाठ्यांच्या मिरवणुकीत पहिला मान पाडळी च्या सासनकाठीस आहे.या निशाण्याची नोंद कोल्हापूर तहसील कार्यालयात व इतिहासकालीन ताम्रपटावर आहे.कोल्हापूर चे राजर्षि शाहु महाराज यांच्या कार्यकालात प्लेग ची साथ आल्यामुळे जोतिबा याञा बंद ठेवण्यात आली होती.त्यावेळी जीवाची पर्वा न करता पाडळकर याञेस पोचले होते.या गोष्टी चा अभिमान व कौतुक वाटुन छ.शाहु महाराजांनी पहिला मान पाडळी गावास दिला. त्या आधी ही प्राचीन काळापासुन ही सासनकाठी जोतिबाला जातच होती.गावात याञा व्यवस्थापन साठी स्वतंत्र ट्रस्ट अस्तित्वात असुन त्याच्या मार्गदर्शन नुसार याञा पार पडते.जोतिबा मानकरी सासनकाठी मध्ये शस्त्र असणारी ( ईटे ) ही एकमेव सासनकाठी आहे.

"सासनकाठी" म्हणजे काय ? हे समजुन घेवु

सासनकाठी म्हणजे नाथ केदाराचा विजय ध्वज. याचबरोबर शिखरी काठी, नंदीध्वज, तरंग  अशी  विविध नाव घेऊन ही प्रथा दख्खन पठार ,कोकण, माणदेश, मावळ ,मराठवाडा,विदर्भ भागात सर्वत्र आढळते.पाडळीची सासनकाठी “कुलध्वज” या प्रकारात मोडते.याच मूळ कालिका पुराणातल्या इंद्र ध्वज महोत्सवाशी संबंधित आहे.वर्षेभर झालेल्या गोष्टी व पुढील वर्षी चे नियोजन दख्खनचा राजा जोतिबा चरणाशी सांगणे या पूर्वंपार चाललेल्या परंपरेने आज ही हजारो सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर जातात.सासनकाठीस शासनकाठी असेही म्हणले जाते.सासनकाठी ही सुमारे ४० ते ४५ फूट उंचीचे जाड वेळुची (कळकाची) असते.हा कळक आणताना व निवडताना विशिष्ट प्रकारे पारख व पूजा विधी केला जातो.हे निशाण,गर्द जांभळ्या रंगाचा फरारा ( पताका ) असतो.प्रत्येक सासन काठीचे निशाण’ हे वेगवेगळे असते. उदा. हिम्मतबहाद्दर चव्हाण सरकार यांच्या क्र.३ व ४ या काठ्या पांढऱ्या रंगाच्या आहेत,चालुक्य वंशीय साळुंखे घराणे म्हणजे नावजीनाथ यांची सासनकाठी ही भगव्या रंगाची आहे.मनपाडळे व फाळकेवाडीच्या सासनकाठी काळ्या पांढऱ्या रंगाच्या आहेत.सासनकाठीस तीन चुनी तोरणे बांधलेले असते.निशानावर फूलांच्या हारांची सुंदर आरास अतिशय कौशल्याने केलेली असते.सासनकाठी खांद्यावर घेऊन चालणे व तोरण्या (दोर) सांभाळणे हे अतिशय कौशल्याचे काम असते.ही तोरणे संभाळण्याचा मान प्रमुख तीन तक्क्षिमा मधील घराण्यांचा असतो व ते लोक ही तीन तोरणे कोशल्याने हाताळतात.

साधारणपणे होळी सणापासुनच गावात याञेची तयारी चालु होते. गुढीपाडव्याच्या दिवशी गावातील मुख्य चौकात ( पार/चव्हाटा ) याठिकाणी संपूर्ण गाव ऐकञ येते.याठिकाणी पंचाग पुजन वाचन होवुन सर्वांना कडुनिंब,गुळ व चिंच यांचे मिश्रण खाण्यास देतात.सर्व जण अगदी कडु असले तरी आवडीने खातात.या नंतर जोतिबा डोंगर येथुन पाडळी गावचे गुरव हे डोंगराच्या याञेचे नियोजन सांगुन संपूर्ण गावाला याञेसाठी जोतिबाला यायचे निमंत्रण देतात.यानंतर स्थानिक याञा व्यवस्थापन ट्रस्ट त्यांचे याञेचे नियोजन व आगामी तयारी सर्व गावाला सांगतात.पाडव्या नंतर दहा दिवसांनी हे निशान याञे साठी जोतिबा डोंगराकडे प्रस्थान करते. त्याच्या आदल्या दिवशी मुख्य चौकात ग्रामसभा होते.यावेळी देवाच्या देवसेवकांना ( कारखानदारांना ) मानपान दिले जावुन त्यांना “कारूका” दिला जातो.याचवेळी जोतीबाकडे २० ते २५ बैलगाड्या या मानाच्या सासनकाठीसोबत जातात.आजच्या धावपळीच्या युगातही पाडळीकरांनी ही बैलगाडी नेण्याची परंपरा जोपासली आहे हे विशेष.बैलगाडी नेण्यासाठी तयारी ही महिनाभर आधी केली जाते यासाठी चांगल्या बैलांची निवड केली जाते.बैलगाडीची डागडुजी केली जाते.

या माध्यमातून महाराष्ट्रात नामशेष होत चाललेल्या “खिल्लार गोवंशाची” ही राखण केली जाते हे ही तितकेच महत्त्वाचे आहे.बैलांना ८ दिवस पुरेल ऐवढा चारा बैलगाडीला कौशल्याने बांधला जातो व त्याचा भार बैलांवर येणार नाही याचीही विशेष काळजी घेतली जाते.तसेच ऊन व पाऊसा पासुन संरक्षण  होण्यासाठी विशेष बांधणी केली जाते.या बैलगाड्या सासनकाठी जायच्या आधल्या दिवशी ग्रामसभा व कारूका वाटप होते व नंतर मानाचे शिंग फुंकल्या बरोबर चांगभल च्या गजरात मोठ्या उत्साहाने सर्व बैलगाड्या या जोतिबा डोंगराच्या दिशेन प्रस्थान करतात.हजारो गावकरी त्याची चार पावले सोबत करतात.बैलगाडी बरोबर शेकडो भक्तही पायी प्रवास चालु करतात यात महत्त्वाच्या “पानपीठ” भक्तांचा समावेश होतो.

"पानपीठ" म्हणजे काय ?
हे समजुन घेवुया.

पाडळी गावातील ग्रामस्थ या पाणपीठचा उपवास करतात.पाणपीठ म्हणजे ज्वारी व शाळू भाजून जात्यावर दळून केलेले पीठ.उपवासासाठी ग्रामस्थ या पीठाचे सेवन करतात.हे पीठ केवळ पाण्याबरोबर उपवास करणारे ग्रामस्थ खातात.भूक लागल्यास केवळ हे पीठ खायाचे,असा तीन दिवस हा उपवास असतो.जोतिबा डोंगरावर पोहचे पर्यंत पानपीठ हाच आहार हे भक्त घेतात.हा संपूर्ण पायी प्रवास अणवाणी पायाने करावा लागतो.डोंगरापर्यंत पोचे पर्यंत अनेक भाविकांच्या पायाला फोड येतात,पण केवळ चांगभलंच्या जयघोषाने या भाविकांना ऊर्जा मिळते.गावातील ज्या माता -भगिनी किंवा ग्रामस्थांना काही कारणामुळे डोंगरावर जाता येत नाही ते भक्त गावात राहुन या प्रकारे तीन दिवस उपवास करतात.डोंगराकडे जाताच्या वेळी सर्व ग्रामस्थ जोतिबा मंदीर येथे जमा होतात यावेळी निशाणाला उंची रेशमी पोशाख चढवला जातो.हारांची आरास केली जाते हे काम अत्यंत अनुभवाने व कौशल्याने केले जाते.पोशाख चढवले नंतर पहाटे ६.१५ वाजता निशाणाची व जोतिबा देवांची आरती होवुन,नारळ “सतका” आदी पुजा विधी होवुन निशाण जोतिबा डोंगराच्या दिशेने प्रस्थान करते.यावेळी पंचक्रोशीतुन हजारो भाविक श्री दर्शनासाठी गर्दी करतात.पहाटे ६.१५ ते सकाळी १०.३० वाजेपर्यंत निशाण गावातील छबिना संपवुन ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरला प्रदक्षिणा घालुन गावातुन बाहेर पडते.या निशाणा बरोबर हजारो ग्रामस्थ पायी,सायकल ,गाडी या माध्यमातुन सोबत करतात.यानंतर हे निशान पाडळी – इंदोली – उंब्रज – कराड – कासेगांव – ऐतवडे – बहिरेवाडी – जाखले – केखले – डोंगर पायथा असा परंपरागत  तीन दिवसांचा प्रवास करत जोतिबा मुख्य याञेच्या आदल्या दिवशी संध्याकाळी श्री यमाई दरबारी मंदीराजवळ हजर होते.तिथे गावचे गुरव,जोतिबा देवस्थान चे भालदार,चोपदार व इतर देवसेवक तसेच पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे पदाधिकारी निशाणाचे स्वागत व पुजन करतात.यानंतर निशाण जोतिबा मंदिराकडे प्रस्थान करते.मुख्य मंदीराला प्रदक्षिणा घालुन,मंदीर शिखराशी निशाणाची भेट घातली जाते.यानंतर मानपान होवुन निशाण आपल्या मुक्काम ठिकाणी मार्गस्त होते. 

मुख्य याञे दिवशी सकाळी सर्व पाडळी ग्रामस्थ मिरवणूकीने जोतिबा देवस्थान व्यवस्थापन समिती तसेच ग्रामपंचायत जोतिबा डोंगर यांची भेट घेतात.यावेळी देवस्थान समिती दुपारी चालु होणाऱ्या मुख्य याञेचे नियोजन सांगतात व निमंत्रण देतात.त्यानुसार ग्रामस्थ याञेसाठी निशाण तयार करतात.यावेळीही हार तुर्रे यांनी निशाण आकर्षक पद्धतीने सजवले जाते.त्यानंतर आरती होवुन निशाण जोतिबा मंदीराकडे प्रस्थान करते.हा सोहळा ही पाहण्या सारखा असतो.हजारो पाडळी ग्रामस्थ स्वयंशिस्तीने चांगभल चा गजर करत मंदीरात दाखल होतात.यावेळी असणारा पाडळकरांचा पांढरी टोपी व सदरा हा पोशाख ही मोठ्या कुतुहलाचा विषय ठरतो.संपूर्ण गर्दीच्या छबिन्यात पाडळकरांची टोपी पडत नाही.यानंतर मंदीरा आवारात प्रवेश करून प्रदक्षिणा घालुन नियोजित स्थळी येवुन थांबतात.

मान्यवर मंञी आदी पदाधिकारी यांचे आगमन झाले वर बरोबर दु.१.३० वाजता भालदार,चोपदार हे याञा चालु झालेचे कळवतात.यानंतर मानाचे निशाण यांचे पुजन मान्यवरांचे हस्ते होवुन चैञी याञा सोहळा चालु होतो.या वेळी प्रचंड गर्दी व उत्साहाचे वातावरण असते.निशाणा सोबत हजारो ग्रामस्थ,भाविक असतात.गावातील घरटी एकतरी माणूस यात सहभागी असतो.मानाच्या सासनकाठी मागे बाकीच्या मानाच्या सासनकाठीचे पुजन केले जाते.लाखोंच्या गर्दितील हि याञा पार पाडणे मोठ्या जिकीरिचे काम असते कारण याञेची वाट ही पाडळकरांनांच तयार करावी लागते पण मुळातच रांगडे पाडळकर ही जबाबदारी पार पाडतात.श्री जोतिबा मंदीर ते यमाई मंदीर व पुन्हा जोतिबा मंदीर असा छबिना असतो यावेळी लाखो भाविक गुलाल खोबरे निशाणावर उधळीत चांगभलचा गजर करतात.सासनकाठी मागोमाग जोतिबा देवांची पालखी निघते.पालखी बरोबर श्री नाथांचा स्वतंत्र लवाजमा असतो.पालखी श्री यमाई मंदीरासमोर आल्यानंतर देव पालखी सहीत सदरेवर बसतात.यावेळी कट्यार रूपी जमदग्नि ऋषि व यमाई देवी यांचा विवाह सोहळा पार पडतो.यानंतर मानाचे निशाण पुन्हा मुख्य मंदीरात येते व  येथे पुन्हा प्रदक्षिणा होवुन देव सदरेवर बसतात.डवरी गीते व नाथ भुजंग कवने आदी विधीमार्ग होवुन तोफ उडल्यानंतर पालखी मंदीरात जाते.निशानाला मानाचा विडा मिळतो व मुख्य यात्रेची सांगता होते.

दुसर्या दिवशी संध्याकाळी निशाण व पालखी प्रदक्षिणा सोहळा होतो.तोफ उडल्यानंतर निरोपाचे विडे घेवुन निशाण परतीचा प्रवास सुरू करते.यावेळी संपूर्ण जोतिबा डोंगरावरील गुरव समाज निरोप देण्यासाठी उपस्थित असतो.याच राञी निशाण डोंगर उतरूनृ मुक्काम ठिकाणी पोचते.परतीचा मार्ग जोतिबा डोंगर – ऐतवडे – कासेगांव – कराड – उंब्रज – वडगाव – पाली – गणेशवाडी – पाडळी असा तीन दिवसांचा असतो.जाताना व येताना ज्या गावात सासन थांबते तीथे छोटी याञा भरते.सासनकाठी जोतीबाकडे मार्गस्थ होताना व माघारी येत असताना रस्त्यात ठिकठिकाणी गावोगावी दर्शनासाठी मोठी गर्दी होते.सुवासिनी महिला निशानास ओवाळण्यास येतात,भाविक मंडळी निशाणास विविध आकर्षक हार,पाच नारळाचे तोरण,नोटांच्या माळा बांधतात.या ठिकाणी छबीना,आरती व अन्नदानाचे नियोजन हे गावकरी मोठ्या आनंदाने व भक्तिने करतात.तीन दिवसांचा प्रवास करून हे निशाण ज्या दिवशी पाडळी गावात पोचते त्या दिवशीच पाडळी गावची याञा असते.यावेळी पाडळी पंचक्रोशी तसेच इतर जिल्ह्यातील लाखो भाविक श्रीं च्या दर्शनासाठी गोळा होत असतात,यावेळी भक्त भाविक हार तुरे,गोंडे,नारळाची तोरणे व नोटांच्या माळा श्री चरणी अर्पण करत असतात.गावच्या पावक्ता (पादुका) या ठिकाण पासुन ही याञा  सायंकाळी ४ वाजता चालु होते व वाजत गाजत हे निशान राञी ८.३० वाजता ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदीर येथे पोचते.त्यानंतर राञी ९.३० वाजता गावातील मुख्य चौकात “व्हण” या पारंपरिक ठिकाणी निशाण छबिन्या साठी उभे राहते.राञभर चालणार्या या छबिन्यात भक्त भाविक व गावकरी लोक श्रींना नारळ तोरणे,नोटांच्या माळा भक्तिभावाने अर्पण करतात.श्रद्धेने नवस बोलले जातात व फेडले जातात.राञभर हा छबिना पार पाडल्या नंतर पहाटे ५ वाजता हे निशान श्री जोतिबा मंदीराकडे प्रस्थान करते.सकाळी ८ वाजेपर्यंत हे निशान जोतिबा मंदीर येथे पोचते त्यानंतर आरती होवुन या दिवसाचा कार्यक्रम संपतो.या नंतर पाच दिवस सकाळ – संध्याकाळी श्रींची आरती होते.पाचव्या दिवशी पाकाळणी (प्रक्शालनाचा) कार्यक्रम असतो.या दिवशी ही भाविक वा देवासेवक विधीत स्वरूपात श्रीनाथांच्या चरणी आपली सेवा अर्पण करतात.राञी ८.३० वाजता महाआरती होते.राञी १० वाजता पाखाळणीचा मुख्य कार्यक्रम चालु होतो यात निशानाला घातलेला पोशाख उतरवला जातो .याञेचा सर्व जमाखर्च जाहीर केला जातो .

  ✍🏻 लेखन – भुषण ढाणे,पाडळी ( सातारा )

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top