चैत्र यात्रामधील सातव्या मानाची सासनकाठी असणार्या किवळकर - संत नावजीनाथाच्या गावची परंपरा

श्री वाडी रत्नागिरी येथील दख्खनचा राजा ज्योतिबा अर्थात नाथ केदारेश्वर हे बद्रिकेदारचेचे रूप आहे.ब्रह्मा, विष्णू, महेश आणि जमदग्नी व १२ सूर्याचे तेज या सर्वाचा मिळून एक तेजःपुंज अवतार म्हणजेच ज्योतिबा किंवा केदारनाथ ! ज्योतिबा या नावाची उत्पत्ती ज्योत या शब्दापासून झाली असून ज्योत म्हणजे तेज, प्रकाश,वायू, तेज, आप (पाणी) आकाश व पृथ्वी या पंचमहाभूतांपैकी तेजाचे शक्तीदैवत म्हणजेच वाडी रत्नगिरीचा ज्योतिबा.

बारा वरसाच्या तपाला नाथ केदार पावला…
दारी यिवून नावजीच्या देव अलख बोलला…

डवर वाजवून पान्हा वांझ म्हशीला फोडला…
भरली पेव उतरंडी अशिष भरून सांडला…

भक्ती मारगी भोगून नान अविरत कष्ट…
नावजीबुवानी किवळला दिला राजयोग श्रेष्ठ…

आपल्या अखंड भक्तीतून किवळच्या नावजीनाथांनी श्री जोतिबा क्षेत्री अढळ पद मिळवले.आजही याच्या खुणा स्पष्ट आहेत.नाथभक्तीत नावजीबुवांनी आपला देह जोतीबा चरणी समर्पीत केला.देवासमोर झोपलेल्या अवस्थेत नावजीबुवांच शिल्प पाहायला मिळेल.असामान्य भक्तीतून त्यांनी श्री नाथांच्या मंदीराच्या कळसावर स्थान मिळवले आहे.देव पालखीसह जिथं स्थानबध्द होतात त्या सदरेवर ही फक्त नावजीबुवा किवळकरांना नामोउल्लेखासह स्थान आहे तसेच खाली चाफेबनातील श्री यमाई मंदीरासमोरील सदरेवर ही नावजीनाथांना पुढे आणि कासेगावकरांना मागे उभं रहायचा मान आहे.

“आला माझा नावजी आनंदला केदाराचा मुखडा

  चोपदार भालदारांकरवी धाडला आवातणाचा पानईडा”

नावजीनाथचे आधी पासूनचे पूर्वज चैत्राच्या वारीला जात होते.या वारीची पूर्वपरंपरा नावजीने पुढे चालवली.किवळ गावातून पूर्वी पायी चालत सासनकाठी डोंगरावर जायची.काळाच्या ओघात अनेक बदल घडून आले. यात्रेला सासन काठी वाहनातून जलद डोंगरावर जाते.परंतु त्या काळातील मानपानाचे रीतीरिवाज आजही पाळले जातात.सासनकाठीचा मार्ग हा सैदापूर – कासेगाव – बैरववाडी- गणेशबाग – शेवट चाफेबनात यमाई जवळ व येतानासुद्धा याच मार्गावरून जागोजागी मुक्काम, महाप्रसाद,भंडारा करत परतीचा प्रवास करून पुन्हा किवळला सासनकाठी येते.सासनकाठी यमाईच्या समोर आल्यानंतर देवस्थान कमिटीचे भालदार चोपदार व पदाधिकारी काठीचं व भक्तांचं आदरपूर्वक स्वागत करतात व सन्मानपूर्वक डोंगरावर सासन काठीचा प्रवेश होतो.व यात्रेला सुरूवात होते. त्याच संध्याकाळी म्हणजे यात्रेच्या पूर्वार्धात सासन काठी देवळा भोवती फिरून छोटासा छबिना निघतो.पालखीच्या सदरे समोर   ( जोतिबाची पालखी ज्या ठिकाणी ठेवतात त्या ठिकाणी ) काठी विराजमान होते.

यात्रेला दुसऱ्या दिवशी हस्त नक्षत्रावर दुपारी दीड वाजता सासनकाठीच्या मिरवणुकीस प्रारंभ होतो. त्यावेळेस देवस्थान कमिटीचे भालदार चोपदार फक्त नावजीच्या सासन काठीस पानाचा विडा देऊन ‘यात्रेस चला’ असं आमंत्रण देते. यावेळेस तोफेच्या सलामीने जोतिबा मंदिरातून यमाई मंदिराकडे पालखी मार्गस्थ होते. हलगी, पिपाणी, तुतारी, सनईच्या तालावर काठ्या नाचवल्या जातात, गुलाल, खोबऱ्याची उधळण करत देवाच्या नावाचा गजर भाविक करतात. एक आगळं वैशिष्ट्यं असं की, भक्त सासन काठीवर गुलाल खोबरे उधळताना इतरांपेक्षाही नावजीच्या वंशाचं भाग्य फार मोठं.उधळलेलं खोबरं व गुलाल देवाला स्पर्श होवून अंगावर पडतो तेव्हा आपण देवाच्या प्रसादात न्हाऊन निघतो. हा गुलालाचा अभिषेक हा आत्मिक शांती देणारा आहे. हे वैभव केवळ नावजीचा कृपाप्रसाद आहे.प्राणीजीव संरक्षण कायद्याअंतर्गत छबिन्यातील बैल,हत्ती हे प्राणी वगळलेत अन्यथा श्री नावजीनाथ किवळकरांच्या सासनकाठीच्या समोर हत्ती चालायचा तसा राजाज्ञेचा रजतपट आहे.पालखी सासन काठी यमाईच्या द्वारी येते तेव्हा सर्व सासन काठ्या यमाईच्या डोंगर उताराला उभ्या करतात मात्र एकट्या नावजीच्या सासन काठीस यमाई मंदिराच्या दारात उभं राहण्याचा मान आहे.त्या ठिकाणी यमाई मंदिरात यमाईदेवी व जमदग्नी यांच्या विवाह सोहळ्याचा धार्मिक विधी होतो.

त्यानंतर श्री ची पालखी व नावजीची सासन काठी जोतिबा मंदिराच्या आवारात येते.त्या ठिकाणी पालखीचे भोई,देवस्थान कमिटीचे भालदार चोपदार यांचं नावजी सासन काठीच्या वतीने श्रीफळ देऊन स्वागत केलं जातं. त्या ठिकाणी पालखीतील जोतिबा व नावजीची सासन काठीची भक्तजण आरती करतात.आरती झाल्यानंतर भालदार चोपदार, किवळकरांना ‘चला’ म्हणून हाक मारतात व देवाच्या पालखीला खांदे देऊन पालखी देवळात घेऊन जातात.हा मान किवळकरांनाच आहे.तोफेच्या सलामीने रात्री दहा वाजता पालखी सोहळ्याची सांगता होते.पहिले दोन दिवस डोंगरावरील पुजाऱ्यांना श्री जोतिबा भक्त संत नावजीच्या काठीची सेवा घडत नाही म्हणून उत्तरार्धात म्हणजे तिसऱ्या दिवशी यात्रेच्या मनोभावे सर्व पुजारी कुटुंब नावजी सासन काठी आनंदाने नाचवत आपण बोललेले नवस सफल झाले व मनोकामना पूर्ण झाल्यामुळे नावजीच्या सासन काठीस नारळांचे तोरण बांधतात.नोटांचे तोरण बांधतात.आदरपूर्वक सन्मानपूर्वक यमाईच्या दरवाज्यापर्यंत वाजतगाजत देवाचं ‘चांगभलं’ म्हणत गुलाल, खोबरं उधळत नावजीच्या काठीस निरोप देतात. असा मान फक्त नावजीच्याच सासन काठीस मिळतो.

नावजीची सासन काठी वरील मार्गावरून परत जागोजागी मुक्काम करत सैदापुरात आल्यानंतर महाप्रसाद होतो. गावातून लोक आनंदाने काठी नाचवतात. पूर्वी वरील मुखामी महाप्रसाद होतो तसेच सैदापुरातून काठी किवळ गावात झापळा आंबा या ठिकाणी येते. गावकरी महाप्रसाद घालतात. वाजतगाजत सासन काठी नावजीच्या देवळाजवळ येते.महाप्रसादात माहेरवाशिणींच्या वडी चपातीचा मानाचा नैवेद्य असतो.चतुर्थीला सासनकाठीचं गावात आगमन होतं सदर चौक,रिकामचावडी,सदर आश्या जागोजाग थांबून सासनकाठीचं औक्षण करून माहेरवाशीणींची नारळांची तोरणं स्वीकारत काठी उत्तररात्री पर्यंत नावजीबुवा जोतीबाच्या मंदीरासमोर ठाण केली जाते.
केदारनाथाच्या प्रसाद रूपी गुलालात रंगलेला पोशाख मोठ्या भक्तीभावानं आंगावर मिरवला जातो.घरोघरी अक्षय तृतीये पर्यंत गोडाधोडाचा नैवेद्य करून डवरी बोलवून त्यांचं पात्र,डवर पुजला जातो.जोतिबा डोंगरावर प्रसाद म्हणून मिळालेले नारळ वाढवून सोबत आणलेला मेवा कांडेबत्तश्यांचा प्रसाद वाटला जातो.या डवर पुजेच्या विधीला “देवबोळवणे “म्हणतात.हा देव बोळवल्या खेरीज गुलाला माखली कपडे धुतली जात नाही हा पुर्वापार चालत आलेला रिवाज आजही पाळला जातो..
कपड्यांवरचा गुलाल उतरला तरी प्रचंड,उत्साह ,उर्जा रूपी गुलालानं रंगलेलं मन त्या दख्खन केदारा चरणी आपला भोळाभाव लीन करून लोक आपल्या कामकाजाला लागतात पुढच्या चैत्रयात्रेची ओढ जागती ठेऊन तेथे आल्यानंतर सर्व ग्रामस्थ प्रसाद वाटतात व सासन काठीची मिरवणुकीची सांगता होते.

  ✍🏻लेखन – अभिजीत साळुंखे,नावजीबुवाचं किवळ
error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top