करवीर निवासनी श्री महालक्ष्मी (अंबाबाई) रथोत्सव

श्री करवीर निवासिनी महालक्ष्मी अर्थात आई अंबाबाई मुख्य उत्सवांपैकी एक उत्सव म्हणजे रथोत्सवाचा दिवस.श्री जोतिबाच्या चैत्र यात्रेनंतर दुसर्या दिवशी रथोत्सव असतो.जोतीबा डोंगरावरील भाविक गावी जाताना आई अंबाबाई चे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात.साधारण संध्याकाळी ०७ ते ०७.३० च्या सुमारास

“नवकोट नारायणी भक्त जन प्रतिपालिनी दीनोद्धारीणी जगदोद्धारीणी

चतुर्धारीणी प्रतिपालिनी राजराजेश्वरी सर्वेश्वरी श्री करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी”

 

अश्या चोपदारांच्या ललकारीनंतर देवीची उत्सवमूर्ती सनई ताशांच्या निनादात श्री पूजक रथामध्ये घेवून येतात.त्यानंतर उत्सव मुर्तीची पूजा बांधण्यात येते.

०९.३० वाजता तोफेची सलामी नंतर देवीचा रथ नगरप्रदक्षिणासाठी बाहेर पडतो.रथाला जिथे भाविक विनंती करतात तिथे रथ थांबून भाविकांची आरती स्विकारली जाते.पुढे गुजरी चौकामध्ये भव्य आतषबाजी करण्यात येते.रथ नगारखाना ओलांडून भवानी मंडपाकडे येतो. यावेळीचे दुश्य हे खूप सुंदर असते.करवीर भूमीमध्ये आईसाहेब आपल्या भक्तांच्या भेटीसाठी येत असते.पुढे रथ भवानी मंडपाच्या चौकामध्ये येतो.श्रीमान महाराज छत्रपतींचा चोपदार महाराजांच्या नावाची ललकारी देतो पाठोपाठ हुजूरस्वारीच आगमन होतं.महाराज देवीचं पंचोपचार पूजन करतात आरती होते,आणि पुन्हा ललकारी होऊन रथ मार्गस्थ होतो.पुढे रथ म.ल.ग हायस्कूल – बालगोपाल तालिम – मिरजकर तिकटी मार्गे नूतन मराठी शाळेसमोर येतो.पाठकांच्या घरासमोर रथ येताच चोपदार व रोषणनाईक रथावरुन उतरतात आणि रंकोबाच्या देवळात जातात.श्री  रंकभैरव अर्थात कोल्हापूर चा कोतवाल जणू अंबाबाई च्या निरोपाचीच वाट बघत सदरेवर बसलेला असतो.महालक्ष्मी च्या चोपदारांनी ललकारी देताच रंकोबा आपल्या देवळात जातो.पुन्हा दर्शन करून हा लवाजमा बिनखांबी गणपती कडे जातो तिथही अशीच पंचोपचार पूजा ललकारी होऊन चोपदार रथावर येतात.

पुढे महाद्वाराचा मुख्य मार्गावर रथ येतो.भाविकांनी काढलेल्या भव्य रांगोळ्या वरून रथ जातो.काही मंडळाच्या वतीने श्री महालक्ष्मी च्या मूर्ती आरास केली जाते व पारंपारिक देवीचा फुटाणे व खडीसाखरेच्या प्रसादाचे वाटप होते.अखेर आईसाहेब प्रदक्षिणा करून महाद्वारात प्रवेश करतात.कदम घराण्यातील स्त्रीया पारंपारिक मानाप्रमाणे आईसाहेब दृष्ट काढतात.श्रीपूजक पालखी घेऊन येतात.रथावरून उतरलेली श्री महालक्ष्मी उत्सव मूर्ती पालखीत बसते.परंपरेप्रमाणे अगस्तींच्या दिपमाळेला प्रदक्षिणा करून सात टप्प्यांवर गायन सेवा  घेऊन आईसाहेबांची पालखी सदरेवर येते.भक्तांना आशिर्वाद देते तोफेची सलामी होताच मंदिरात जायला निघते. पालखी बालदत्ताजवळ क्षणभर थांबते व नैवेद्याच्या पूर्ण पानानं देवीची ओवाळणी होते आणि उत्सव मूर्ती गाभाऱ्यात जाते कापूरारती शंखतीर्थ व शेजारती होऊन रथाची सांगता होते.

वेबसाईट बद्दलचा अभिप्राय नक्कीच नोंदवा

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top