सासनकाठी म्हणजे नाथ केदाराचा विजय ध्वज. याचबरोबर शिखरी काठी, नंदीध्वज, तरंग अशी विविध नाव घेऊन ही प्रथा दख्खन पठार ,कोकण, माणदेश, मावळ ,मराठवाडा,विदर्भ भागात सर्वत्र आढळते.पाडळीची सासनकाठी “कुलध्वज” या प्रकारात मोडते.याच मूळ कालिका पुराणातल्या इंद्र ध्वज महोत्सवाशी संबंधित आहे.वर्षेभर झालेल्या गोष्टी व पुढील वर्षी चे नियोजन दख्खनचा राजा जोतिबा चरणाशी सांगणे या पूर्वंपार चाललेल्या परंपरेने आज ही हजारो सासनकाठ्या जोतिबा डोंगरावर जातात.सासनकाठीस शासनकाठी असेही म्हणले जाते.सासनकाठी ही सुमारे ४० ते ४५ फूट उंचीचे जाड वेळुची (कळकाची) असते.हा कळक आणताना व निवडताना विशिष्ट प्रकारे पारख व पूजा विधी केला जातो.हे निशाण,गर्द जांभळ्या रंगाचा फरारा ( पताका ) असतो.प्रत्येक सासन काठीचे निशाण’ हे वेगवेगळे असते. उदा. हिम्मतबहाद्दर चव्हाण सरकार यांच्या क्र.३ व ४ या काठ्या पांढऱ्या रंगाच्या आहेत,चालुक्य वंशीय साळुंखे घराणे म्हणजे नावजीनाथ यांची सासनकाठी ही भगव्या रंगाची आहे.मनपाडळे व फाळकेवाडीच्या सासनकाठी काळ्या पांढऱ्या रंगाच्या आहेत.सासनकाठीस तीन चुनी तोरणे बांधलेले असते.निशानावर फूलांच्या हारांची सुंदर आरास अतिशय कौशल्याने केलेली असते.सासनकाठी खांद्यावर घेऊन चालणे व तोरण्या (दोर) सांभाळणे हे अतिशय कौशल्याचे काम असते.ही तोरणे संभाळण्याचा मान प्रमुख तीन तक्क्षिमा मधील घराण्यांचा असतो व ते लोक ही तीन तोरणे कोशल्याने हाताळतात.