जोतीबा देवाला वाहणाऱ्या दवण्याचे महत्व व प्राचीन कथा

डोंगराच्या वाटं झाली भगतांची दाटी
मानपान ईसरूनी घेती गळाभेटी…

देवाची ईभुती गुलाल लावती ललाटी
हर्षोल्ल्हासे भक्त उधळती खोबऱ्याची वाटी…

केदारभक्त नावजी आलेत आपल्या दारी
केखल्यात आनंदले भाविक नर नारी…

पुरणा वरणाचा निवद रांधीला सुगरणी
अगाध आहे नावजीनाथाच्या भक्ती ची करणी…

चांगभल्याची देऊन आनंदे ललकारी
समाजारतीत तल्लीन भान हरपती सारी…

 चैत्र महिन्याच्या पहिल्या पक्षात सर्व देवांना दवणा वाहिला जातो.वाडी रत्नागिरी वरील श्री जोतिबा अर्थात नाथ केदार देवाला गुलाल,खोबरे व दवना ही वनस्पती अर्पण केली जाते.पन्हाळा तालुक्यातील जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेले केखले या गावामध्ये दवण्याची शेती केली जाते.दवण्या ची शेती आजही पारंपरिक पद्धतीने केली जाते.कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या गावाशिवाय दवणा कोठेही पिकत नाही.साधारण नोव्हेंबर महिन्याच्या सुमारास दवण्याचे रोपण केले जाते,त्यानंतर सहा महिन्यांमध्ये हे पीक येते.चैत्र यात्रेच्या सुमारास ओला दवणा देवाला अर्पण केला जातो त्यानंतर मोसम संपल्यानंतर वाळलेला दवणा देवाला अर्पण केला जातो.साधारण १० रुपयांपासून २५ रुपयांपर्यंत या पेंढीची विक्री केली जाते.

दवण्याचे मूळ संस्कृत नाव “दमना” असे आहे तसेच शास्त्रीय नाव आर्टेमिसिया पॅलेन्स आहे.वात,पित्त,कफ या त्रिदोषाचे दमन करणारी ही औषधी वनस्पती आहे.दवणा हा सुगंधी,चवीला कडू आणि तिखट आहे.या वनस्पतीपासून बाष्पनशील तेल मिळते,हे तेल दाट व सुगंधी असून ते उच्च प्रतीच्या अत्तरात मिसळतात.तसेच दवण्याचा वापर पुस्तकांमध्ये ठेवण्यासाठी केला जातो.

चैत्र महिन्याच्या पहिल्या पक्षात सर्व देवांना दवणा वाहिला जातो त्या संदर्भात एक कथा सांगितली जाते.ती पुढील प्रमाणे 

दवणा म्हणजे “दमनक”.शिवाच्या क्रोधातून कालभैरव प्रगटला,प्रगट होताच त्यानं ब्रम्हदेवांच पाचवं मस्तक तोडले ते मस्तक त्याच्याच डाव्या हाताला ब्रम्हहत्या होऊन चिकटलं त्यातून गळणारं रक्त प्यायला कुत्री,पिशाचं गोळा झाली तर त्यांचा आणि या उग्र बटूच्या भय निर्माण करणाऱ्या रव म्हणजे आवाजामुळे याला भैरव असं नाव मिळालं.साक्षात पितामहांना शासन झाल्यान सगळी सृष्टी घाबरून गेली.भैरवाला आवर घालण्यासाठी विष्णूंनी त्याला शाप दिला सर्वांच दमन करणारा तू वनस्पती होशील तत्क्षणी तो उग्र भैरव उग्र वासाची वनस्पती झाला तोच दमनक अर्थात दवणा ! असा हा भैरव दवणा झाल्यावर विष्णूंनाच दया आली त्यांनी त्याला मूळ रूपात आणून दवण्याला वर दिला आज पासून तू आम्हाला सर्व देवांना प्रिय होशील चैत्र महिन्यात आम्ही तिथीवार तुला धारण करु ( उदा तृतीया गौरी चतुर्थी गणपती पंचमी लक्ष्मी षष्ठी कार्तिक …. पौर्णिमा सर्व देव ) चतुर्दशी ही तुझी हक्काची तिथी तेव्हा तू स्वत: आणि एकवीरा हा दवणा धारण करा. याला अनुसरून आजही आपण चैत्र महिन्यात देवाला दवणा अर्पण करतो.

error: Content is protected !! आपल्याला हे पेज आवडल्यास नक्कीच आपल्या मित्र -मंडळी पर्यंत पोहचवा.
Scroll to Top