डोंगराच्या वाटं झाली भगतांची दाटी
मानपान ईसरूनी घेती गळाभेटी…
देवाची ईभुती गुलाल लावती ललाटी
हर्षोल्ल्हासे भक्त उधळती खोबऱ्याची वाटी…
केदारभक्त नावजी आलेत आपल्या दारी
केखल्यात आनंदले भाविक नर नारी…
पुरणा वरणाचा निवद रांधीला सुगरणी
अगाध आहे नावजीनाथाच्या भक्ती ची करणी…
चांगभल्याची देऊन आनंदे ललकारी
समाजारतीत तल्लीन भान हरपती सारी…
चैत्र महिन्याच्या पहिल्या पक्षात सर्व देवांना दवणा वाहिला जातो.वाडी रत्नागिरी वरील श्री जोतिबा अर्थात नाथ केदार देवाला गुलाल,खोबरे व दवना ही वनस्पती अर्पण केली जाते.पन्हाळा तालुक्यातील जोतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेले केखले या गावामध्ये दवण्याची शेती केली जाते.दवण्या ची शेती आजही पारंपरिक पद्धतीने केली जाते.कोल्हापूर जिल्ह्यामध्ये या गावाशिवाय दवणा कोठेही पिकत नाही.साधारण नोव्हेंबर महिन्याच्या सुमारास दवण्याचे रोपण केले जाते,त्यानंतर सहा महिन्यांमध्ये हे पीक येते.चैत्र यात्रेच्या सुमारास ओला दवणा देवाला अर्पण केला जातो त्यानंतर मोसम संपल्यानंतर वाळलेला दवणा देवाला अर्पण केला जातो.साधारण १० रुपयांपासून २५ रुपयांपर्यंत या पेंढीची विक्री केली जाते.