साहसी खेळ अनुभवा
खेळण्याची प्रवृत्ती ही माणसाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे.लहान बालकापासून वृद्धापर्यंत सर्वांनाच खेळांची आवड असते.खेळांना मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. जीवनातील व्यथा व चिंता विसरावयास लावून मनाला विरंगुळा देण्याचे तसेच शरीर व मन ताजेतवाने करण्याचे काम विविध खेळ करू शकतात. शारीरिक श्रमांच्या खेळांत शरीरास भरपूर व्यायाम मिळतो आणि त्यामुळे शरीर काटक व बळकट बनते. खेळांमुळे मनोधैर्य, चिकाटी, खिलाडू वृत्ती इ. गुणांचीही वाढ होते. सांघिक खेळामुळे सहकार्याची वृत्ती, संघभावना व नेतृत्वगुण यांना वाव मिळतो आणि या गुणांचा जीवनात विविध प्रसंगी उपयोग होतो.खेळातील चढाओढीमुळे खेळांचा दर्जाही वाढतो. राष्ट्राराष्ट्रांतील क्रीडास्पर्धांमुळे आंतरराष्ट्रीय सामंजस्यही वाढीस लागते.निरनिराळ्या खेळांतील कौशल्य, प्रावीण्य व श्रेष्ठता अजमावण्यासाठी खेळांच्या स्पर्धा, सामने व शर्यती विविध पातळ्यांवर आयोजित केल्या जातात. या स्पर्धांना खेळीमेळीचे स्वरूप असते आणि यशस्वी खेळाडूंना पारितोषिके व पदके देऊन त्यांचा सन्मान करण्यात येतो.