आम्ही ते सर्व वाचन करून उजव्या बाजूस भिंतीवर असलेला डिजिटल फलक वाचू लागलो त्यावर या मंदिराची मंदिराची संकल्पना व आराखडा साकारणारे योग प्रणेता, सेंद्रिय शेती शिल्पकार आर्यकृषक,आजरा भूषण श्री. मोहन शंकर देशपांडे याचे चित्र होते तसेच संपर्कासाठी खाली काही संपर्क क्रमांक हि लिहलेले होते.त्या बाजूलाच एक दुसरा डिजिटल फलक सुद्धा होता त्यावर मंदिराविषयी लिहलेली माहिती अशी – हे मंदिर खाजगी आहे. श्री समर्थ रामदासांनी अकरा पराक्रमी मारुतींची स्थापना केली.हा मारुती पराक्रमी – आश्वासक नवसाचा आहे. ब्रह्मतेजाच्या नियमांचे काटेकोट पालन करून बांधलेले हे जगातील एकमेव मंदिर आहे. त्यामुळे आपल्या मनात अनेक प्रश्न येणार आहेत. प्रत्येक प्रश्नाचे आधुनिक शास्त्रीय परिभाषेत उत्तर दिले जाईल आपले समाधान होईलच आणि आगळा वेगळा आनंद हि होईल – जगण्याचा अर्थ कळल्याने… अशा आशयाची मंदिराची माहिती देणारा तो फलक होता.त्याखाली देखील काही संपर्क क्रमांक नोंद केले होते. ह्या मंदिराचे ईंजिनियर श्री. दत्तात्रय गणेश सोहनी व फरशीवरील अक्षरांचे कोरीव काम श्री. बी. व्ही. ओतारी ( कालिका आर्टस् , गडहिंग्लज ) यांनी केले आहे तर फरशीवर अक्षरबद्ध केलेले विचारधन हे श्री. मोहन शंकर देशपांडे यांच्या निरनिराळ्या पुस्तकांमधील आहे. तशा आशयाच्या माहितीच्या दोन फरशी तेथे बसवण्यात आल्या होत्या.असे हे सुंदर व भव्य असे मंदिर अवश्य पहावे.